आंब्याचे झाड!
- डॉ. मुकुल स. गोडबोले
कोईतून जन्म घ्यावे,
धरणीमातेचा हातभार,
वृक्ष असावे आंब्याचे,
कल्पतरू, सर्वांना आधार!
पाना-फांद्यांचा पसारा,
देई सावली व थंड वारा,
वाटसरू वा गाय-वासरू,
विसावी छायेत आईच्या!
सणा-सुदीला तोरण,
हिरवी आंब्याची पानं,
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा,
पानांचा डौल सदाबहार!
वर्षभर चाले कारभार,
वसंत ऋतूत येई बहार,
मोहोर, कैरी, आंबा,
उल्हासित होई उन्हाळा!
आंबट, पण उत्साहवर्धक,
कैरी ची मजाच न्यारी,
लोणचे, पन्हे, साखरंबा,
बरणीत वर्षभर टिकवा!
फळ आंब्याची थोरवी पहा,
अल्लड युवराज होई राजा,
केसरी, सुवासीन, चवदार,
बागायतदारांना काळजी फार!
सीझनचा पहिला आंबा,
किंवा दर उतरेस तोवर थांबा,
आमरस, चिरून, वा आइस्क्रीम खा,
आंबा नं आवडे? डोके तपासा!
हापूस, पायरी, तोतापुरी,
३०० हून अधिक जाती,
आंबा कोकणचा वा मलीहाबाद,
महती पोचली अटकेपार!
कलम करून एकाच झाडावर,
कैक जातीचे आंबे उगवा,
एक असो वा अनेक,
फळाच्या चवीत गोडवा!
कलमी आंबा दुसर्या जातीचा,
तरी झाड ना करे हाल-अपेष्टा,
स्वतःचे कायदे नियम ना लादी,
आंबा राखी मूळ गुण व जाती!
पोटची कोय अर्पूनी,
फेडतो मातीचे देणे,
धडे घ्यावे माणसाने,
किमयागार, झाड आंब्यांचे!
०४/०५/२०२५
Comments
Post a Comment