"हाडांच्या आरोग्याचे मूल्यमापन" - एक समालोचन !
हाडांचे आजार व दुखणी फक्त वयाशी जोडली जातात. पण असे विकार हे जनुकीय, अपघात, अयोग्य वापर, दुर्लक्ष करणे, आदी कारणांमुळे देखील उद्भवतात. हाडांचे आजार वेळीच ओळखले गेले तर त्यावर उपचार घेऊन ते बरे देखील होऊ शकतात. काही विशिष्ट उपकरणं वापरून हाडांचे विकार किंवा तसे घडण्याची शरीराची प्रवृत्ती ओळखता येते. अशी उपकरणं रुग्णालयं व आरोग्य केंद्रांमध्ये जरी उपलब्ध असली, तरी त्यांच्या मदतीने चिकित्सा करून घेणे हे सर्वसामान्यांसाठी शक्य होत नाही. आधुनिक काळात नवनवीन उपकरणं येत राहिली. पण तरी, अचूक व किफायतीशीर निदान करणारी उपकरणे अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्या पलीकडील आहेत. रक्त-लघवी चाचणी करून हाडाचे विकार शोधणारी प्रणाली विकसित आहे, पण त्यात नेमके कोणते घटक शोधावेत व त्याचे विवेचन कसे करावे यांवर संशोधन चालू आहे.
पण, या सगळ्या विषयांची एकत्रित माहिती, साध्या भाषेत, उपलब्द होत नाही व सर्वसामान्यांपर्यंत पोहचत नाही.
नुकतेच, डॉ. अमृता नाईक यांनी या विषयांचे "बायोमटेरियल्स ऍडव्हान्ससेस" या आंतरराष्ट्रीय नियतकालीकेत (एल्सवियर प्रकाशन) अवलोकन मांडले आहे. त्यांच्या समालोचन प्रबंधाचे "Sensing the future: A review on emerging technologies for assessing and monitoring bone health" असे नाव आहे. बायोसेंसिंग, बोन मॉनिटरींग, बायोसेन्सर व बायोमार्कर, यासारख्या महत्वाच्या विषयांवर विस्तृत माहिती प्रस्तुत केली आहे. डॉ. अमृता नाईक यांच्या प्रयत्नांमुळे हाडांचे विकार आणि त्याचे अचूक व वेळेवर निदान या विषयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकणे शक्य आहे. नवं तंत्रज्ञान विकसित होण्यास देखील मोलाचा हातभार लागणार आहे.
समालोचन वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा:
https://doi.org/10.1016/j.bioadv.2024.214008
डॉ. अमृता नाईक या स्टेम सेल्स (मूळ पेशी) व टीशू इंजिनिअरिंग (ऊती अभियांत्रिकी) संशोधक आहेत. सध्या कोथरूड येथील डॉ. विश्वनाथ कराड एम.आय.टी विश्व् शांती विद्यापीठात जैवविज्ञान व तंत्रज्ञान विभागात सहाय्यक प्राध्यापक पदावर रुजू आहेत. त्यांनी पुण्यातील राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र (NCCS) येथून पीएच्.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांचे मिजंकायमल स्टेम सेल्स, हाडांचे विकार (ऑस्टिओपोरोसिस, संधिवात), चिकित्सा, बायोग्राफ्ट, उपचार या विषयांवरील मूलभूत संशोधन, तसेच स्तनाचा कर्करोग, मायक्रोबायोम, फायटोकेमिकल परिणाम, आदी विषयांवर आतापर्यंत एकूण चौदा आंतरराष्ट्रीय प्रबंध प्रकाशीत झाले आहेत.
-- डॉ. मुकुल स. गोडबोले
कर्करोग संशोधक व सहाय्यक प्राध्यापक, डॉ. विश्वनाथ कराड एम.आय.टी विश्व् शांती विद्यापीठ, कोथरूड
Comments
Post a Comment