तुझा , मुकुल - डॉ. मुकुल स. गोडबोले वाळलेला दाणा , मज पेरले तुझ्या कुशी लाभले पाणी , रवी , हवा , तुझी छाया नि माया , धरती माता काळ जरा उलटला , नि कोंब मज फुटला जन्मलो नि वाढलो , तू माझी आभाळमाया आईच्या कुशीत खेळण्यात मग कसला आलाय झगडा ? तुझ्या गर्भातून डोकावता नमन तुज करितो माता वाढ होण्यास माझी मुळं रोवली तुझ्यात कधीही नं कुरकुरता , ती तू सामावली स्वतःत सामर्थ्य माझे मज , अवगत तू केले गर्भसंस्कार उत्तम झाले , तुझ्या हातभारे , मला गोंडस रूप आले मुकुल ते वृक्ष वाढलो तुझ्यामुळे पानं , फुलं , बिया वाहतो तुज हर ऋतूत , त्याचेही तू करसी चीज , जन्म देऊनी नवीन मुकुल आपुले नाते इतके घट्ट धरून ठेविसी एकसंघ उन्मळून जरी पडलो परी तुझ्यात परत सामावलो सांभाळ ग आई मज मी बाळ तुझ्या कुशीत आलो